• +91 2352-295594
  • info@nachnegram.com
  • ता. जि. रत्नागिरी

नाचणेत कचरा प्रक्रिया प्रकल्प: रोज दीड टन प्लास्टिकवर प्रक्रिया

प्लास्टिक निर्मूलनासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने एक पाऊल टाकले असून, नाचणे (ता. रत्नागिरी) येथे प्लास्टिक कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतीमधून दिवसाला सुमारे तीन टन कचरा संकलित केला जाणार आहे. त्यातील दीड टनाहून अधिक प्लास्टिकवर प्रक्रिया करून तो खासगी कंपनीला दिला जाईल. यातून कचरा संकलित करणाऱ्यांसह प्रक्रिया प्रकल्प असलेल्या ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळणार आहे. केंद्र पुरस्कृत स्वच्छ भारत मिशनअंतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, मैलागाळ व्यवस्थापन, प्लास्टिक व्यवस्थापन व गोबरधन याला महत्व दिले आहे.

प्लास्टिक व्यवस्थापनासाठी जिल्ह्यात तालुकानिहाय आराखडा बनवण्यात आला आहे. रत्नागिरी तालुक्यातील नाचणे ग्रामपंचायतीत प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तालुक्याचा भौगोलिक विस्तार जास्त असल्यामुळे मोठ्या व सधन ग्रामपंचायतीजवळील ग्रामपंचायतीचे मिळून एक क्लस्टर अशी दहा क्लस्टर बनवली आहेत. प्रकल्पासाठीची जागा निश्चित झाली असून, त्याला २४ लाख ९५ हजार ९१७ रुपये स्वच्छता अभियानातून मंजूर झाले आहेत. या निधीतून कचरा प्रक्रियेसाठी आणि वर्गीकरणासाठी अशा दोन शेड उभारल्या जातील. बेलिंग, क्रशर डस्ट रिमुव्हर ही मशिन घेतली जाणार आहे. दिवसाला सरासरी तीन टन प्लास्टिक कचरा गोळा होईल असा अंदाज आहे. त्यातील एक हजार ६०० किलो कचरा प्रक्रियेसाठी उपयुक्त ठरेल. प्रक्रिया केलेला कचरा विक्रीतून महिन्याला सुमारे सहा लाख ७२ हजार रुपये ग्रामपंचायतीला मिळतील. त्यातील सुमारे पाच लाख ७२ हजार रुपये खर्च होतील.

हा आठ मजूर, वीजबिल, आरोग्यविषयक साहित्य, कचरा विकत घेण्यावर खर्च होतील. सुमारे ९८ हजार रुपये उत्पन्न ग्रामपंचायतीला मिळेल. योग्य व्यवस्थापन केल्यास वर्षाला सुमारे सव्वाअकरा लाख रुपये उत्पन्न मिळू शकते. अन्य ग्रामपंचायतीकडून येणाऱ्या कचऱ्यासाठी किलोला आठ रुपये दिले जाणार आहेत. यावर तीन लाख ८४ हजार रुपये खर्च होतील. या प्रकल्पाला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रशासकीय तर कार्यकारी अभियंत्यांकडून तांत्रिक मान्यता मिळाली आहे. पदवीधर शिक्षक आमदार निवडणुकीमुळे निविदा प्रक्रिया राबवली गेलेली नाही.

अशी प्रक्रिया केली जाणार

९४ ग्रामपंचायतीमधून कचरा संकलित केल्यानंतर वर्गिकरण केले जाईल. बाटल्या, खुर्च्या, मोठ्या वस्तू बाजूला काढून प्लास्टीक पिशव्या किंवा पातळ वस्तू प्रक्रियेसाठी घेण्यात येतील. पातळ प्लास्टीक प्रेस करुन त्याचे आकारमान कमी केले जाईल. त्याचे गठ्ठे बांधून ते कच्चा माल म्हणून कंपनीला पाठविले जातील. दिवसाला दिड टनाहून अधिक प्लास्टीकवर प्रक्रिया होईल. मोठ्या वस्तू थेट कंपन्यांना दिल्या जाणार आहेत.