भौगोलीक माहिती
रत्नागिरी हे भारतातील पश्चिम किनारपट्टीत वसलेले महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे. या भागाचा उत्तर-दक्षिण सुमारे १८० किमी लांबीचा आणि पूर्व-पश्चिम सुमारे ६४ किमी लांबीचा विस्तार आहे. हा जिल्हा १६.३० अंश ते १८.०४ अंश उत्तर अक्षांश आणि ७३.०२ अंश ते ७३.५३ पुर्व रेखांश या पट्टयामध्ये येते. जिल्हयाचे एकूण भौगालिक क्षेत्र ८३२६ चौ कि.मी. आहे. सह्याद्रीच्या डोंगरांनी या शहराला पूर्वेकडून वेढले आहे. या डोंगरांच्यापलीकडे सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्हे आहेत. शहराच्या उत्तरेला रायगड जिल्हा आहे, तर पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला सिंधुदुर्ग जिल्हा आहे.
रत्नागिरी साधारणतः 3 भागांत विभागली जाऊ शकते.
समुद्र किनाऱ्यालगतचा प्रदेश – हा प्रदेश साधारणतः समुद्रकिनाऱ्यापासून १० ते १५ किमीपर्यंत विस्तारला आहे आणि हा भाग समुद्रसपाटीपासून कमी उंचीवर आहे आणि इथे सुमारे २५०० मि.मी. पाऊस पडतो. या क्षेत्रातील बहुतांश व्यवसाय हे समुद्राशी निगडित आहे. या परिसरात असंख्य किनारे, खाडी, समुद्र किल्ले, बंदरे , गरम पाण्याचे झरे, लेणी, मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळे, निसर्गरम्य स्थळे आहेत. तसेच हे शहर काही महान व्यक्तिंचे जन्मस्थान आहे. पर्यटन क्षेत्रामध्ये प्रामुख्याने आंतरदेशीय व समुद्री जलमार्ग, समुद्री उद्याने, समुद्रपर्यटन, नौकाविहार, पाणबोटी, मासेमारी यासारख्या जल क्रीडा समाविष्ट आहेत. परंतु रस्त्यांची सुविधा व्यवस्थित नसल्यामुळे इथे पोहोचणे कठीण आहे.
डोंगरी प्रदेश – ह्या प्रदेशाचा विस्तार सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडील उतारापासून १० ते १५ कि.मी. पर्यंत आहे. हा प्रदेश समुद्रसपाटीपासून थोडा उंचीवर आहे. इथे सुमारे ३५०० मि.मी. पाऊस पडतो. जरी जंगले जलद गतीने नष्ट होत असली तरी या प्रदेशाचा बहुतांश भाग हा जंगलांनीच आच्छादलेला आहे. पश्चिमेचा वारा वाहणाऱ्या ठिकाणी तापमानात घट आढळते. या परिसरात डोंगरी किल्ले, घाट रस्ते, जंगले, वन्यजीवन इत्यादींचा समावेश आहे. या भागात अनेक ठिकाणी मनोरम्य दृश्ये आहेत. पर्यटकांसाठी याठिकाणी वन्य जीवन निरीक्षण, जंगल सफर, पक्षी अभयारण्य, ट्रेकिंग, हायकिंग, हॉलिडे रिसॉर्ट्स यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.
मध्य प्रदेश – हा परिसर समुद्र किनारपट्टी आणि डोंगराळ प्रदेशांच्या मध्ये असून तो समुद्रसपाटीपासून मध्यम उंचीवर आहे. मुंबई-गोवा-महामार्ग आणि कोकण रेल्वेमार्गामुळे इथे जाणे सुलभ झाले आहे. परंतु धार्मिक स्थळे, गरम पाण्याचे झरे इत्यादी पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या जागा इथे खूप कमी आहेत.
नद्या
रत्नागिरी जिल्हयात वाशिष्टी, जगबुडी, सावित्री, बाव, रत्नागिरी, मुचकुंदी, जैतापूर आदि प्रमुख नद्या असून त्या सह्याद्री पर्वतात उगम पावून पश्चिमेकडे वाहत जातात आणि अरबी समुद्राला जाऊन मिळतात. नद्यांचे पात्र उथळ असल्यामुळे पावसाळयात त्यांचा प्रवाहाला खूप गती असते. त्यामुळे या नद्यांचा मर्यादित उपयोग होतो.
डोंगर रांगा
जिल्ह्याच्या पूर्व सीमेवर सह्याद्रीच्या उंच रांगा आहेत. या पर्वत शिखरांची उंची साधारणपणे 400 ते 2000 मीटर आहे. हा खडकाचा उभा भाग व किनारपट्टी यामधला प्रदेश एकमेकांना समांतर अशा असंख्य डोंगर रांगा असल्यामुळे रत्नागिरी जिल्हयात प्रवेश करताना घाट उतरुन प्रवेश करावा लागतो.
वनक्षेत्र
रत्नागिरी जिल्हयाचे एकूण वनक्षेत्र 7001.67 हेक्टर आहे. या वनामध्ये साग, निलगिरी, खैर, आंबा, काजू, फणस, आईन, धामण, शिवन, साग, जांभूळ, चिंच, शिवरी यासारखी झाडे आढळतात. जिल्हयाचे क्षेत्रफळ एकूण 8208 चौ.कि.मी असून त्यापैकी राखीव वनक्षेत्र 48.91 % आहे. संरक्षित वनक्षेत्र 0.03 % तसेच वर्गीकृत वनक्षेत्र 23. 88 आहे.
कृषि क्षेत्र
लागवडीखाली आलेले क्षेत्र – 2 लाख 75 हजार हेक्टर. प्रमुख पिके : आंबा, नारळ, फणस, सुपारी, भात, नाचणी.
मुद्दा | तपशील |
---|---|
स्थान | कोकण विभाग, महाराष्ट्र |
अक्षांश | १६.३०° ते १८.०४° उत्तर |
रेखांश | ७३.०२° ते ७३.५२° पूर्व |
एकूण क्षेत्रफळ | ८,२०८ चौ. कि.मी. |
लांबी (उत्तर ते दक्षिण) | २२५ कि.मी. |
रुंदी (पूर्व ते पश्चिम) | ६४ कि.मी. |
किनारपट्टीची लांबी | १६७ कि.मी. अरबी समुद्रालगत |
सीमावर्ती जिल्हे | रायगड (उत्तर), सिंधुदुर्ग (दक्षिण), कोल्हापूर, सातारा, सांगली (पूर्व) |
भूगर्भशास्त्र | मुख्यतः लेटराईट खडक |
सागरी शेती | तांदूळ, नारळ, सुपारी |
डोंगराळ शेती | आंबा, काजू, नाचणी, कांदे |
मातीची समस्या | काही भागांत खारट माती असल्यामुळे शेती अडचणीत |
मुख्य नद्या | सावित्री, वशिष्ठी, शास्त्री, जगबुडी, बाव, मुचकुंदी, जैतापूर |
महत्त्वाची नदी | वशिष्ठी नदी (जलवाहतुकीसाठी वापरली जाते) |
महत्त्वाची खाडी | केळशी, दाभोळ, जयगड |
हवामान | आर्द्र; उन्हाळा, पावसाळा, हिवाळा |
सरासरी पर्जन्यमान | ३,०३८ मिमी |
पावसाळ्याचा कालावधी | जून ते ऑक्टोबर (जुलैमध्ये सर्वाधिक पाऊस) |