गोबरधन प्रकल्प

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पर्यावरणपूरक उपक्रम

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत न्नाचणे ग्रामपंचायतीकडून “गोबरधन प्रकल्प” राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाचा उद्देश गावातील दररोज निर्माण होणारा ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करून त्यावर प्रक्रिया करणे आणि त्यापासून ऊर्जा, खत तसेच इतर उपयुक्त वस्तूंचे उत्पादन करणे हा आहे.

दररोजच्या घरगुती कचऱ्याचे योग्य वर्गीकरण हे या प्रकल्पाचे पहिले पाऊल आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामस्थाने आपला कचरा ओला व सुका असा दोन भागांमध्ये विभागून, स्वतंत्र बकेटमध्ये साठवून ठेवावा. त्यानंतर ग्रामपंचायतीची कचरा गोळा करणारी गाडी दररोज येऊन हा कचरा उचलून नेईल.

सदर गोबरधन प्रकल्पात या गोळा केलेल्या कचऱ्यावर आधुनिक पद्धतीने प्रक्रिया करून त्यापासून गॅस निर्मिती केली जाणार आहे. हाच गॅस प्रकल्पाच्या कार्यान्वयनासाठी ऊर्जेचा प्रमुख स्रोत म्हणून वापरला जाणार आहे. तसेच या प्रक्रियेतून निर्माण होणारे उपउत्पादन खत निर्मितीसाठी आणि वीज निर्मितीसाठीही उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे केवळ स्वच्छता नव्हे तर पुनर्नवीकरणीय ऊर्जेचा वापर करून पर्यावरणपूरक विकास साधला जाईल.

या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायत परिसर स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त राहण्यास मदत होईल. प्रत्येक घरगुती लाभार्थ्याला ओला कचरा साठविण्यासाठी एक बकेट ग्रामपंचायतीकडून दिले जाणार आहे. तसेच सुका कचरा साठविण्यासाठी प्रत्येकाने स्वतंत्र बकेट ठेवणे बंधनकारक असेल.

हा प्रकल्प स्वच्छता, ऊर्जा निर्मिती आणि पर्यावरण संवर्धन या तिन्ही क्षेत्रांना एकत्र आणणारा आहे. चला, आपण सर्वांनी मिळून या गोबरधन प्रकल्पात सक्रिय सहभाग घेऊया आणि आपला न्नाचणे गाव स्वच्छ, हरित आणि आत्मनिर्भर बनवूया.