मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प – 10KL

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नाचणे ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम

महाराष्ट्र राज्यातील ग्रामपातळीवरील पहिला “मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प” आपल्या नाचणे गावात यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला आहे. हा प्रकल्प स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविण्यात आला असून, गावातील स्वच्छतेबरोबरच पर्यावरणपूरक उपाययोजना म्हणूनही हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

या प्रकल्पांतर्गत आपल्या घरातील सेप्टिक टाकीतील मैला (गाळ) यावर प्रक्रिया केली जाणार असून, त्यापासून सेंद्रिय खत निर्मिती केली जाईल. प्रक्रियेअंती तयार झालेले पाणी शेती आणि बागायतीसाठी उपयुक्त ठरणार आहे. या उपक्रमामुळे ग्रामस्थांना खत आणि पाण्याचा पर्यावरणपूरक उपयोग करता येणार आहे.

मैला उचलण्यासाठी ग्रामपंचायतीकडून “मैला सक्शन व्हॅन” उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे वैयक्तिक परिसर स्वच्छ राहण्यास मदत होईल आणि डासांची उत्पत्ती कमी होण्यास हातभार लागेल. ग्रामपंचायतीकडे मैला उचलण्याची सेवा उपलब्ध असून, या सेवेसाठी प्रती सेप्टिक टाकी रुपये 3,500 (रुपये तीन हजार पाचशे फक्त) एवढे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. इच्छुकांनी ग्रामपंचायत नाचणे कार्यालयाशी संपर्क साधून आपली नोंदणी करावी.

तसेच आपल्या शौचालयाच्या गॅस पाईपवर बसविण्यासाठी मच्छर प्रतिबंधक जाळी ग्रामपंचायतीतर्फे वाटप करण्यात येत आहे. कृपया ही जाळी योग्यप्रकारे बसवून डास निर्मिती रोखण्यासाठी सहकार्य करावे.

आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे नाचणे ग्रामपंचायत स्वच्छ, निरोगी आणि पर्यावरणपूरक गाव बनविण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे. चला, एकत्र येऊया — आपल्या गावासाठी, आपल्या आरोग्यासाठी आणि स्वच्छतेसाठी.