स्वच्छ भारत मिशन: नाचणे ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नाचणे ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम; महाराष्ट्रातील पहिला ग्रामीण ‘मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प’ यशस्वी!

रत्नागिरी (नाचणे): ग्रामीण भागातील स्वच्छतेचा दर्जा सुधारण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नाचणे ग्रामपंचायतीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नाचणे गावात महाराष्ट्र राज्यातील ग्रामपातळीवरील पहिला “मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प” यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला आहे. गावातील स्वच्छतेसोबतच कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणारा हा प्रकल्प संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्रासाठी एक पथदर्शी मॉडेल ठरत आहे.

प्रकल्पाचे स्वरूप आणि पर्यावरणपूरक फायदे:

या नाविन्यपूर्ण प्रकल्पांतर्गत गावातील प्रत्येक घरातील सेप्टिक टाकीमधील मैला आणि गाळ गोळा करून त्यावर आधुनिक पद्धतीने प्रक्रिया केली जाणार आहे. या प्रक्रियेदरम्यान गोळा केलेल्या मैल्यापासून दर्जेदार गांडूळ खत आणि सेंद्रिय खत तयार केले जाईल, जे शेतकऱ्यांसाठी विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध असणार आहे. खत निर्मितीसोबतच प्रक्रियेअंती स्वच्छ झालेले पाणी शेती आणि बागायतीसाठी वापरता येणे शक्य होणार आहे. यामुळे पाण्याचा अपव्यय टाळून एक उत्तम पर्यावरणपूरक चक्र तयार होईल, तसेच उघड्यावर किंवा बागेत मैला टाकल्याने होणारे प्रदूषण आणि दुर्गंधी कायमची नष्ट होईल.

‘मैला सक्शन व्हॅन’ सेवेचा शुभारंभ आणि संपर्क

घरोघरी जाऊन सेप्टिक टँक मधील मैला योग्य दरात आणि सुरक्षितपणे काढण्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे ३००० लीटर क्षमतेची आधुनिक “मैला सक्शन व्हॅन” उपलब्ध करून देण्यात आली आहे. या वाहनामुळे मानवी हस्तक्षेप न होता मैला उचलला जाईल, ज्यामुळे वैयक्तिक आणि सार्वजनिक परिसर स्वच्छ राहण्यास मदत होईल. सांडपाणी साचून राहणे बंद झाल्यामुळे डासांची उत्पत्ती कमी होऊन आजारपणाला आळा बसेल. ज्या ग्रामस्थांना आपल्या घराची सेप्टिक टाकी रिकामी करायची आहे, त्यांनी मार्गदर्शन आणि नोंदणीसाठी ग्रामपंचायत नाचणे कार्यालयाशी किंवा थेट रणजित सुवारे (९६८९१६५२५३) आणि तन्मय सावंत (७२४९००५२५७) यांच्याशी संपर्क साधावा.

डास निर्मूलनासाठी मच्छर प्रतिबंधक जाळीचे वाटप

केवळ मैला व्यवस्थापनच नव्हे, तर आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नाचणे ग्रामपंचायतीतर्फे एक विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. गावातील घरांच्या शौचालयाच्या गॅस पाईपमधून डास बाहेर पडू नयेत यासाठी मच्छर प्रतिबंधक जाळीचे मोफत वाटप करण्यात येत आहे. सर्व ग्रामस्थांनी ही जाळी ग्रामपंचायतीतून आणून आपल्या शौचालयाच्या पाईपवर योग्य प्रकारे बसवून घ्यावी आणि डास निर्मिती रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे नाचणे गाव स्वच्छ, निरोगी आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे.